अभ्यासाचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतःबद्दल बरेच 'शोध' लागतात असे आढळून येतं. तो निकाल 'result ' असेन तर बऱ्याच जणांना अमानवी शोध लागल्याचे बोलले जातं. त्यातील बऱ्याच जणांना असा शोध लागतो की त्यांनी दररोज १६ ते १८ तास अभ्यास केला होता. आता हा असला अभ्यास अमानवीच म्हणावा लागेन, नाही का? अहो मानव म्हटला तर त्याला ६-८ तास झोप पाहिजे, एखादा तास जेवणास लागेल, बरं विद्यार्थीदशा म्हटली म्हणजे फिरणे (हुंदडणे) आलेच. आता एवढे सगळे करून १६-१८ तास कोणी मानव कसा अभ्यास करेल. तो किंवा ती अमानविचं म्हणायला पाहिजे. काहींना आठवते की, त्यांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतले होते. काहींनी विसरलेल्या तहान-भुकेची आठवण होते. बर अशा शोधात ह्या बहाद्दरांचे आई-बाप ही सामील असतात. नव्हे तर ह्या शोधांची घोषणाच आई-बापच करतात. मग माझ्यासमोर हिंदी चित्रपटाचा एक scene उभा राहतो. शक्यतो नायक हातात पुस्तक घेऊन अभ्यास(?) करत असतो आणि त्याची आई त्याला 'गाजर का हलवा' नाही तर 'मुलीं(मराठीतील मुळे, नाहीतर वेगळेच समजाल) के पराठे' खाऊ घालत असते. काय एकेकाच्या आया, नाही? नाहीतर आम्ही अभ्यासासाठी कायम आईच्या हातचे 'धपाटे' खाल्ले, आणि वर 'तोंडातून आवाज काढायचा नाही' असा दम पण खाल्ला. आता 'धपाटे' खाल्यावर धड स्तुती सुद्धा करू देत नाहीत! काय एकेकाच्या आया, नाही?
काही शोध विलक्षण धक्कादायक असतात. आता हेच बघा ना, एक मित्र एक मोठी परीक्षा पास झाला. आता ह्याला वरीलपैकी एकही शोध लागला नाही. त्याला तिसराच शोध लागला की, "त्याने म्हणे अभ्यासच केला नव्हता", आता बोला!! आता हा अभ्यास न करताच पास होतो तर मग आम्ही काय झक मारली होती. ह्याच्या अशा विलक्षण शोधामुळे आमची मात्र पुरती भंबेरी उडाली कारण ह्याने आपली अभ्यास चिकित्सा आमच्या आऊसाहेबांनाही सांगितली. मग काय ह्यला लाचरुपी बक्षीस देऊन विनंती करावी लागली "सांग न लेका अभ्यास केला म्हणून, आमची कायले गोची करून राहिला!"
आता या उलट अभ्यासाचा 'निकाल' लागणाऱ्यांची तर कथाच निराळी! काय आणि कसे सांगू हो तुम्हाला? तुम्हाला म्हणून सांगतो, फार अवघड असतो हो... पण अशा हलाखीच्या परिस्थितीत पण शोध लावण्याचे स्पिरीट कायम असतं बरंका!! परीक्षेच्या दिवशी एका धीरगंभीर झालेल्या मित्राला विचारले, "काय राजे कसा गेला पेपर?" तर एकदमच कोल्हापुरी शिवी हासडून ओरडला, "रांडीच्या पेपर काढणारयाचे बायकोशी भांडण झालेलं दिसतंय. बायकोनं काढला असेन ह्याला घराबाहेर आणि त्यो राग आपल्यावर निघाला!" त्याचा निकाल बहुतेक त्याच दिवशी कळला होता बहुदा. बघा म्हणजे विद्यार्थीदशेतच शोधाचे तर्कशास्त्र किती विकसित होते ते. केवळ प्रश्न वाचून अगदी उत्तरे येत नसताना हा राजा direct परीक्षकाच्या घरात घुसला. विलक्षण आहे!
असे बरेच विलक्षण शोध लागत असतात. काहीना पेपर 'out of syllabus ' असल्याचा शोध लागतो तर काहीना आपली जोडलेली पुरवणीच हरवल्याचा! बरीच जण तर एकदम TRANS मध्ये जाऊन आत्म्याचा शोध लावतात. अशाच शोधसत्रामध्ये एका मैत्रिणीला पण(!) शोध लागला. "निकाल काही पण असो, आपण परीक्षा देतो म्हणजे आपण लै 'भारी' आहोत." आता निकालावरून वजन कळण हा शोधच म्हणा की! असले शोध मला फक्त वजनकाट्याचा काटा ९९ च्या पुढे गेला की लागतात.
असे भारी भारी शोध लावण्याची माझी फार इच्छा आहे. 'मी १६ तास अभ्यास करतो', 'पहाटे ४ वाजता उठून अभ्यास करतो', 'रोज एक तास ध्यान लावतो' इत्यादी इत्यादी. पण आमचे शोध बघणार कोण? त्यासाठी 'निकाल' लागलेला चालत नाही, चांगला 'result ' लागतो! आता त्यासाठी आधी पुस्तकांचा शोध घेतो...