विद्या बालनचे भजे...
गोष्ट मुंबईची, ४-५ वर्ष झाली असावीत. विद्या बालनचा नुकताच सिने-सृष्टीत प्रवेश झाला होता. परिणीता, लगे रहो मुन्नाभाई प्रदर्शित झाले होते. त्यावेळे मी माझ्या दोन मित्रांसोबत चेंबूर परिसरात राहत होतो. विद्या बालनने माझ्या ह्यातल्याच एका मित्राचे बुब्बुळ फिरवली होती. मुन्नाभाई ४-५ वेळा बघून झाला होता, परिणीताची गाणे शेकडो वेळा रूम मध्ये वाजवल्या जात होती. सकाळचा अलार्म, मां का फोन, मित्राचा फोन वा मैत्रिणीचा मिस्सड कॉल काहीही वाजले तरी तेच.. 'पल पल हर पल... पियू बोले पियू बोले...'!! हा मित्र तार सप्तकात! त्याचे सूर-ताल-लय सगळेच बिघडले होते... आम्ही परेशान.. विद्या बालन छानच हो.. पण आता अजीर्ण झाले होते... त्याला समजावून बघितले, धमकावून बघितले पण काहीही उपयोग नाही.. तो काही स्वर्गातून उतरेना... बर असले उद्योग एकट्याने करावेत तर हा कसला ऐकतोय.. स्वतः मुन्नाभाई झाला आणि आम्हाला 'circuit ' करून टाकले होते. मग आमचा तरी काय ईलाज.. 'भाई तू टेन्शन मत ले भाई, तू पढाई पे ध्यान दे' हा मंत्र आम्ही स्वीकारला आणि ह्याची 'गांधीगिरी' आम्ही सहन करायला लागलो.
कधी काय करावे लागेल ह्याचा नेम नव्हता. विद्या बालन येणार म्हटले की हा कधीही आणि कुठल्याही मॉल मध्ये आम्हाला घेऊन जायचा. त्या विद्या बालनला म्हणे पॉल कोहेलो चे पुस्तके आवडायची. झाल्ल.. शोधून शोधून वाचून काढली! एक दिवस तर सकाळी सकाळी बोंबाबोंब करून आमची झोप उडवली. घाबरून उठलो आणि ह्याला विचारले, तर आम्ही चाट पडलो. 'मुंबई टाईम्स' मध्ये तिच्या फोटो सहित तिचा प्रोफील आला होता. ती चेम्बुराचीच म्हटल्यावर आमच्या ह्या मुन्नाभाईच्या अशा पल्लवित झाल्या. त्यातलाच कुठल्या तरी भज्याच्या ठिकाणाचा उल्लेख होता. तिथली भजे म्हणे ह्या विद्या बालनला खूप आवडायची! मुन्नाभाई पेटले... दिवस रविवाराचाच होता... वेळ घालावायाचाच होता... भजे खायचा ठराव पास केला. कसेतरी सकाळचा प्लान संध्याकाळवर ढकलून आम्ही ताणून दिली...
संध्याकाळी बोंबाबोंब करून ह्याने उठवलेच. उठतो तर काय, नवीन नवीन ड्रेस घालून, x - men सेंट मारून हा तयारच बसला होता. ह्याला जसे काही विद्या बालन बघायलाच येणार होती. ती काही येणार नव्हती आणि आम्हाला कोणी 'कांदे-पोहे' देणार नव्हते. बेत होता तो कांद्याच्या भज्याचा..
आमची शोध मोहीम चालू झाली...प्रथम भज्याचा गाडा असावा का छोटे हॉटेल यावर वाद झाला. एका ठिकाणी भजे खाता-खाता वाद मिटला. विद्या बालन ती, साध्या गाड्यावर का भजे खाणार, ह्या मुन्नाभाईच्या वक्तव्यास तोड नव्हती... आम्ही मग चेम्बुरचे छोटे हॉटेल धुंडाळायला लागलो. प्रत्येक ठिकाणी आधी भजे खायचे आणि मग हॉटेल मालकाकडे चौकशी करायची, अशी strategy मुन्नाने ठरवली. आम्ही 'circuit ' होतोच साथ द्यायला. ह्याला म्हणे ह्याची आणि विद्या बालनची taste किती match होते ते बघायचे होते. ४-५ ठिकाणी हा असा प्रयोग झाला, आणि फसला. ह्याला सगळीच भजी आवडली. पण विद्या वाली भजी एकही नव्हता. आम्ही तिसऱ्याच ठिकाणीच नांगी टाकली होती. मग strategy बदलण्यात आली. आधी चौकशी आणि मग खाणे असे ठरले. त्यानुसार अजून ५-६ ठिकाणी बोंबलत फिरलो. सगळी हॉटेल्स पालथी पाडून झाली. मग भज्यांच्या गाड्यांची शोध-मोहीम चालू झाली. २-३ गाडे शोधल्यानंतर शेवटी अखेर तो गाडा सापडला, गाड्यावाल्याने पण दुजोरा दिला आणि घाण्यात भजे पण दिसली...
आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. मुन्नाभाईने लगेच 'ती भजे व तो' असे फोटो काढली. मग 'फक्त भज्यांचा' फोटो झाला. मग त्या फोटोत आम्हीही आलो, भज्जेवालाही आला. त्याने खूष होऊन तीच भजे परत घाण्यात टाकली. फिरून फिरून आमचेही कावळे 'विद्या विद्या' करत होतीच. २-२ डिश फस्त झाल्या. मुन्नाभाई तर 'आम्रखंड' खातोय या अविर्भावात ती भजे खाऊ लागला. ह्याचे स्वतःचे लग्न असल्यासारखे आग्रह करून करून तिसरी डिश पण खाऊ घातली. मग आम्ही थांबलो. ह्याचा उत्साह काही मावळत नव्हता. आणखीन दोन डिश ह्याने गिळल्या. मग थोडा ताळ्यावर आला आहे, आता थांबवेल म्हटलं, तर तेवढ्यात आमच्या तिसऱ्या मित्राला हुक्की आली. विद्या बालनचा भाऊ असल्यासारखा हा पेटला. अजून घे, अजून घे करत हा मुन्नाभाईच्या 'पोटा'वर चालून गेला. गेल्या कित्येक दिवसाचा राग त्या आग्रहात होता. 'हीच बहती गंगा', म्हणून मग मीही पेटलो. विद्या बालनचे गाणे म्हणू म्हणू, तिचे वेगवेगळे फोटू दाखवत दाखवत त्याला डझनावारी डिशss खाऊ घातल्या. शेवटी गाड्याचा मसाला संपला, घाण्याचे तेलही आटले. मग आम्ही आवरते घेतले. ह्याचे काळीज पण वरमले होते. मग ह्या अजगराला आम्ही उचलले आणि घरी नेले.
... नंतर १५ - २० दिवस ह्याचा काळजातला चुकलेला ठेका पोटात शूल होऊन पेटला होता. office नाही ना जेवण! ना मां का फोन ना मैत्रिणीची आठवण! पोट धरून पोटातून बोंबलायचा... आमच्या नावाने शंख करायचा.. असंख्य शिव्या घातल्या.. अगदी पोटातून... आम्ही 'room - freshner ' आणून शांत पणे मज्जा पाहत होतो. विद्या बालनचे सगळे पोस्टर फाडले. मोबाईल मधील एकनाएक गोष्ट डिलीट केली. 'मुंबई टाईम्स' बंद केला. अखेर तो 'शूल' शांत झाला. आम्ही सुटलो, तोही सुटला आणि विद्याही.... ही बघा कशी हसत आहे --